राज्यातील सव्वा कोटी लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस बाकी

0

मुंबई : राज्यात नवीन कोविड आजाराच्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने दैनंदिन लसीकरणामध्ये वाढ होत आहे.

कोविशिल्डची सध्या मागणी आहे. मात्र, लसीचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे लसीची मागणी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने केंद्र शासनाकडे केली आहे. राज्यात कोविशिल्डचा दुसरा डोस राहिलेल्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल १ कोटी ३१ लाख आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात कोरोना नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने आरोग्य विभाग सतर्क आहे. त्यादृष्टीने दैनंदिन लसीकरणात वाढ होत असून दुसऱ्या, तिसऱ्या लाटेमध्ये लसीकरण सुरू झाल्यावर अनेकांनी कोविशिल्ड लस घेण्यास प्राधान्य दिले. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी होता. मात्र, डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाचे रुग्ण राज्यात कमी प्रमाणात आढळत होते. त्यामुळे लसीकरणाच्या टक्केवारीवरही परिणाम झाला. पहिल्या डोसचे लसीकरण सर्वच जिल्ह्यांमध्ये ७० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान झाले. मात्र, दुसऱ्या डोसचे लसीकरण अनेकांचे शिल्लक राहिले. आता पुन्हा नव्याने चौथी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला, तसेच नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती झाल्याने अनेकांनी लसीकरण केंद्राकडे पावले वळविली. सद्य:स्थितीत राज्यात कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध नसल्याने केवळ कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांचेच लसीकरण सुरू आहे. त्यादृष्टीने राज्याच्या आरोग्य विभागाने केंद्र शासनाकडे कोविशिल्ड लसीची मागणी नोंदविली आहे. ही लस पुढील आठवड्यापर्यंत राज्यात येण्याची शक्यता असल्याचेही समजते.

१ कोटी ३१ लाख लाभार्थी दुसऱ्या डोसपासून दूर
राज्यात सध्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस राहिलेल्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटी ३१ लाख एवढी आहे. तसेच १८ ते ५९ वयोगटातील बूस्टर डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची टक्केवारी ११ टक्के आहे. यावरून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे लसीकरण राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण पूर्ण केले जात आहे.

लसीकरण सत्राचे करा नियोजन
कोविशिल्ड लसीचा साठा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत कमीत कमी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी लसीकरण सत्राचे नियोजन पूर्ण करावे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडे याद्यानुसार संबंधित लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना लसीकरण सत्राच्या नियोजनाची माहिती द्यावी व जिल्हा, महापालिका स्तरावरून लस वाटपाचे नियोजन करावे, अशा सूचना अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

५ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांचा प्रिकॉशन डोस बाकी
राज्यात एकूण ५ कोटी ४३ लाख ६४ हजार ५९३ लाभार्थ्यांचा कोविशिल्ड लसीचा प्रिकाॅशन डोस बाकी आहे. त्यामुळे राज्यातील बूस्टर डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची सध्याची टक्केवारी ही केवळ ११ टक्के एवढी आहे.

६ कोटी ७४ लाख डोसची गरज
कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस तसेच प्रिकॉशन डोस मिळून राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये ६ कोटी ७४ लाख ८२ हजार १०९ लाभार्थ्यांना कोविशिल्ड डोसची गरज आहे. त्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.

जिल्हा दुसरा डोस शिल्लक लाभार्थी
अहमदनगर ६,०५,९९४
अकोला २,८०,२३५
अमरावती ४,४६,२७९
औरंगाबाद ५,५९,३४२
बीड ३,१७,८६४
भंडारा ४७,८६७
बुलढाणा ३,४६,८७७
चंद्रपूर १,९८,१६९
धुळे २,०४,७१३
गडचिरोली १,२५,६२१
गोंदिया ८८,९०२
हिंगोली ५८,२५०
जळगाव ४,७६,२३५
जालना १,२९,६२२
कोल्हापूर ५,९६,०१८
लातूर २,६६,०४३
मुंबई ८,७८,६५५
नागपूर ८,१८,५८१
नांदेड ४,१३,७५५
नंदूरबार २,६९,८६६
नाशिक ५,३१,३९८
उस्मानाबाद २,२६,६८७
पालघर ३,९२,६७७
परभणी २,१२,२८५
पुणे १२,७१,८३८
रायगड २,९९,५४२
रत्नागिरी १,२१,९१०
सांगली २,७२,७४४
सातारा ३,३४,४४२
सिंधुदुर्ग ६८,५७६
सोलापूर ७,६९,७०७
ठाणे ९,०८,६८५
वर्धा १,६९,३९३
वाशिम १,००,७५६
यवतमाळ ३,०७,९८८
एकूण १,३१,१७,५१६

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:02 06-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here