रत्नागिरी : मुंबई व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रचंड लोंढ्या समोर जिल्हा प्रशासनाने अक्षरशः हात टेकले आहेत. त्यातच तपासणीला गेलेले सुमारे १७०० स्वाब तपासणी विना परत आले असून सांगली मधील प्रयोगशाळेने आता रत्नागिरी जिल्ह्यातून स्वाब घेण्यास नकार दिला आहे. यामुळे आता हि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आता यापुढे जिल्हा रुग्णालयात ४०० कोरोना पॉझिटिव्ह व १५०० सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र दिवसेंदिवस जिल्ह्यात येणाऱ्या लोकांमुळे आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. भविष्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना देखील होम कॉरंटाईन करण्याच्या सूचना द्याव्या लागतील असा धक्क्कादायक खुलासा जिल्हाधिकारी यांनी केला आहे. मुंबई वरून येणारे ६० टक्के नागरिक पास घेऊन तर ४० टक्के नागरिक विना परवानगी येत आहेत. यातील ६० टक्के नागरिकांना देखील जिल्हा प्रशासनाला न विचारता मुंबईतून परस्पर परवानगी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. आता सांगली प्रयोगशाळेने स्वाब घेण्यास नकार दिल्याने त्याबाबतची माहिती राज्य सरकार कडे पाठवली असून अद्यापही त्याबाबत निर्णय झाला नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. आता कोरोना सोबत जगण्यासाठी सर्व नागरिकांनी तयार राहावे असे आवाहान देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे. शहरातील दुकाने देखील नियम व अटींवर सुरु करण्यास परवानगी दिली जाणार असून आता प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर ती उघडायची असून. स्वतःची काळजी घेत आता पुढील काळात जगणे अपरिहार्य आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
07:07 PM 11/May/2020
