कोरोना से डरोना !

सध्याच्या काळात कोरोना (covid 19) या घातक विषाणूशी सुरु असलेल्या लढ्याने आपल्या सर्वांचेच आयुष्य बदलून गेले आहे. या विषाणूने आपल्या रोजच्या जीवनात गतिशून्यता आणली आहे असे म्हणायला हरकत नाही. चीन मधील वूहान मध्ये सुरू झालेल्या ह्या रोगाने आज जगभर हाहाकार माजवला आहे. आपला देश सुद्धा ह्या विषाणूला सामोरे जाऊन लढा देत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार डॉक्टर्स, नर्सेस, इतर आरोग्य सेवा देणाऱ्या व्यक्ति व पोलिस स्वतःचा जीव धोक्यात घालून समर्थपणे ही जबाबदारी पेलत असून याबद्दल आपण त्यांचे ऋणी असणे आवश्यक आहे. यासोबतच या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण ही सर्वतोपरी ह्या विषाणूला रोखण्यात आपले योगदान देत आहात. हा अनुभवातूनच डॉक्टरांचे असलेले महत्व हे ओळखणे काळाची गरज आहे व डॉक्टर नसते तर हा काळात आपण कुणाकडे आशेने पाहिलं असत हा विचार करणं हि तितकेच महत्वाचे ठरते. डेंटिस्ट हे देखील ह्याच आरोग्य सेवेतील एक महत्वाचे घटक आहेत. डेंटिस्टचा रुग्णाच्या तोंडाशी संबंध येत असल्याने, ह्या विषाणूच्या संसर्गाचा डेंटिस्टना सर्वात जास्ती धोका निर्माण होऊ शकतो असे अनेक अभ्यासांमधून निदर्शनास आले आहे. तसेच दातांमध्ये ड्रिलिंग करताना हवेमध्ये जंतूयुक्त द्रव्यपदार्थांचा बारीक फवारा (aerosols) पसरतो आणि ह्यामुळेही कोरोनाचा जंतुसंसर्ग होऊ शकतो. हा जंतूयुक्त द्रव्यपदार्थाचा बारीक फवारा (aerosols) हवेमध्ये बराच काळ टिकूनही राहू शकतो. ह्या कारणांमुळे स्वतःला आणि इतर जणांना करोना विषाणूची लागण होऊ शकते आणि म्हणूनच हा विषाणू समाजात पसरू नये याकरिता संपूर्ण देशामध्ये डेंटिस्टनी आपले दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ‘BREAKING THE VIRUS CHAIN’ मध्ये डेंटिस्टचे मोलाचे योगदान आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना डेन्टिस्टकडून आपल्या दातांची ट्रीटमेंट करून घेणे सुरक्षित असू शकते का ? हा प्रश्न प्रत्येक दंतरुगणाच्या मनात येत असणार आणि ते स्वाभाविक आहे. मागे वळून पाहिले तर १९८६ मध्ये भारतात आलेल्या HIV या जीवघेण्या विषाणूने डेंटल प्रैक्टिसची बरीच समीकरणे कायमची बदलली. प्रैक्टिसमध्ये ग्लोव्हसचा वापर वाढला व तसेच ट्रीटमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे निर्जतुकीकरण करण्यास विशेष प्राधान्य दिले गेले. असेच काही बदल कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळेही होतील आणि ते करणे बंधनकारक व काळाची गरज ठरेल. उपकरणांचे निजतुकीकरण करणे, जंतुसंसर्ग नियंत्रित करणे ह्या बाबी अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या व सेन्टर फॉर डीसीस कंट्रोलच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये STANDARDS OF CARE चे अत्यावश्यक घटक म्हणून नमूद केल्या आहेत आणि त्यांचे पालन करणे हे आपल्या आणि रूगणांच्या हिताचेच आहे. जेव्हा आपण आपल्या डेंटिस्टकडे दातांच्या तपासणीसाठी किंवा उपचारासाठी त्यांच्या दवाखान्यात जाता त्यावेळी डेंटिस्ट हे मास्क, हेडकॅप आणि ग्लोव्हस घालून व त्यावर सॅनिटायझर ने ते स्वच्छ करूनच आपल्या दातांची तपासणी करतात. त्याचबरोबर तपासणीसाठी किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी आपले डेंटिस्ट अनेक उपकरणे वापरतात. हि उपकरणे तुमच्या दातांवर वापरण्यापूर्वी विविध टप्यांमध्ये निजतुक केली जातात. सर्वप्रथम हि उपकरणे एका केमिकलच्या साहाय्याने हातात ग्लोव्हस घालून साफ केली जातात व पुढील टप्यात Ultrasonic cleaner ह्या मशीनच्या साहाय्याने ठराविक वेळेसाठी परत साफ केली जातात. ह्या मशीनच्या वापराने ह्या उपकरणांवर अडकलेले जंतुयुक्त सूक्ष्म कण काढून टाकले जातात. त्यानंतर ह्या उपकरणांना सुकवले जाते आणि उपचारपद्धतीनुसार वेगवेगळ्या प्लास्टिक पाऊचेस मध्ये पॅक केले जाते. या पाऊचेसच्या साहाय्याने ह्या उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे, विभक्तीकरण करणे, किंवा पुढील उपचारापर्यंत त्यांचा साठा करून ठेवणे सोपे जाते. ह्या पाऊचेसना अपॉइंटमेंटनुसार आणि ट्रीटमेंटच्या स्वरूपानुसार निर्जतुकीकरणासाठी Autoclave ह्या मशीनमध्ये एका विशिष्ट दाबाखाली, तापमानाखाली आणि ठराविक वेळेसाठी ठेवले जाते. हे मशीन दाबाखाली तयार झालेल्या वाफेचा वापर करून सर्व पाऊचेस मधील उपकरणांना निर्जंतुक करते. आजच्या काळात प्रत्येक दवाखान्यात Autoclave असणे बंधनकारक आहे. हे एकच असे मशीन आहे ज्याच्या साहाय्याने दातांच्या विविध उपकरणांचे पूर्णपणे निजंतुकीकरण होते. Autoclave च्या सहाय्याने निर्जतुकीकरण करणे हे तुमच्या आणि डेंटिस्टच्या हिताचेच आहे.
निजतुकीकरण होऊन आलेली उपकरणे आता तुमच्या उपचारासाठी वापरली जाऊ शकतात आणि हे पाऊचेस डेंटिस्ट आपल्यासमोरच उघडतात. दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे ट्रीटमेंट केली जाणारी डेंटल चेअर आणि सतत वापरात असलेली उपकरणे आणि जागा ह्यांचे दोन रूग्णांच्या मध्ये केमिकल च्या साहाय्याने निर्जंतुकीकरण केले जाते.
कोरोनाचा संसर्ग थांबेपर्यंततरी आपले डेंटिस्ट PPE KIT चा वापर करतील. ह्यातील गाउन हा जवळपास १५० GSM पेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक ने बनलेला असतो व त्यासोबत हेडकॅप, मास्क, गॉगल, फेस शील्ड, ग्लोव्हस आणि शु कव्हरही वापरले जाते.
रवर डॅम हे उपकरण म्हणजे जणू दातांचा रेनकोट ! ह्या वरच्या पत्रकांचा वापर करून ज्या दातांची ट्रीटमेंट करायची आहे तेवढेच दात रेनकोट घातल्यासारखे वेगळे करून त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात. ह्याचा फायदा असा कि डेंटिस्टचा तुमच्या लाळेशी खूप कमी संपर्क होतो ज्यामुळे जंतूयुक्त द्रव्यपदार्थांचा बारीक फवारा खूप कमी निर्माण होतो आणि ह्यामुळेच तुम्हाला आणि तुमच्या डेंटिस्टला होणाऱ्या जंतुसंसर्गाचे प्रमाण कित्येक पटींनी कमी होते.
कोरोना विषाणूवरती जगभरात अद्यापही ठोस उपाय नसल्याने Prevention is better than cure या उक्तीप्रमाणे सर्वांनी काळजी घेणे महत्वाचे ठरते . आपल्यासारखे बरेच दंतरुग्ण हे दात दुखीसाठी आपल्या डेन्टिस्टनी दिलेली औषधे घेत आहेत आणि दवाखाने पुन्हा उघडण्याची वाट पाहत आहेत. कोरोनानंतर दंतोपचार करून घेणे हे धोकादायक तर नाही ना अशी शंका त्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. परंतु वर नमूद केल्याप्रमाणे उपकरणांचे विविध प्रकारच्या निर्जंतुकीकरणामुळे रुग्णांना घाबरण्याची अथवा मनात भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही.व हे सर्व करण्यात येणारे उपाय तुमच्या हितासाठी व सुदृढ आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळेच कोरोनानंतर आपल्यावर होणाऱ्या दंत उपचारांबद्दल निर्धास्त राहा ! योग्य ती काळजी रुग्णांनी तसेच दंतवैद्यांनी घेतल्यास दंतवैद्यकीय व्यायासायावर कोरोनामुळे आलेल्या संकटावर सहज मात करता येईल ! GO CORONA!!

डॉ. क्षितिज समीर जोशी
M.D.S (Endodontics)
रूट कॅनॉल तज्ञ 9421939541

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here