मुंबई : महापुराचा तडाखा बसलेल्या पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ८ ते १० दिवस पडत असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला आहे. आता पाऊस कमी असून, त्याची तीव्रताही कमी झाली आहे. येथील पावसाची नोंद ३०० मिलीमीटरहून १५० मिलीमीटरपर्यंत खाली आली आहे. परिणामी आता पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला राहील. मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
