महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी; संजय राऊत म्हणाले..

0

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला तारीख पे तारीख सुरुच असून आता पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे.

कदाचित त्याच दिवशी घटनापीठावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर सलग सुनावणी घेतली जाईल. दरम्यान, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला निश्चित झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मिश्कील भाषेत टिप्पणी केली आहे.

घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल,14 फेब्रुवारी व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं प्रेमानं होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार असून शिवसेनेतील बंडाळी, विधानसभा अध्यक्ष निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. संजय राऊत म्हणाले की, आमचं राज्यघटनेवर प्रेम आहे, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे. आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.

शिवसेना फोडणे भाजपचे स्वप्न

तत्पूर्वी, संजय राऊत यांनी शिवसेना फोडणे हे शरद पवार यांचं स्वप्न नव्हते, तर ते भाजपचे होते. हे राष्ट्रीय धोरण भाजपचे आहे. या कटात ते सामील झाले आहेत. आता राज्यातील घटनाबाह्य सरकारचा मृत्यू ठरलेला आहे, अशी टीका त्यांनी केली होती. वेळेत निकाल लागल्यास फेब्रुवारीपर्यंत हे सरकार कोसळेल, असा दावाही राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, कोणत्याही दबावाखाली स्वायत्त संस्था येऊ नये. या देशात न्याय व्यवस्था आहे की नाही हे या केसवरुन दिसून येईल. आम्ही सत्याच्या पलिकडे काहीच मागत नाही. लोकशाहीत कोणते आदर्श निर्माण करणार आहेत हे या प्रकरणातून जगासमोर जाणार आहे. आता सरकार आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करतील, असा दावा त्यांनी केला. आम्ही अधिवेशनात काढलेली प्रकरणे ईडीला दिसत नाहीत का, असा सवाल राऊत यांनी केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना मागील सुनावणीवेळी करण्यात आलेल्या युक्तीवादाचा दाखला दिला. गेल्या सुनावणीवेळी आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला होता. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यावं, अशी विनंती केल्याची आठवणही सिब्बल यांनी खंडपीठाला करुन दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचं मत घेऊन ही सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी घेणार असल्याचं जाहीर केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 10-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here