मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जावून जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या ‘परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त समस्त परिचारक बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. जागतिक ‘परिचारिका’दिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, मानवतेच्या कल्याणात रुग्णसेवेचं स्थान सर्वोच्च आहे. जगभरातल्या परिचारिकांनी त्यांच्या सेवाकार्यातून मानवतेची अखंड सेवा केली आहे. परिचारक बंधु-भगिनींना समाजात स्नेहाचं, आदराचं स्थान लाभत आलं आहे. आज जगावर कोरोनाचं संकट असताना असंख्य परिचारिका भगिनी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. उपचारांच्या बरोबरीनं रुग्णांना धीर, विश्वास, आत्मबळ देत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत याच परिचारिकांची भूमिका मुख्य असून या लढाईत त्याच मुख्य सैनिक आहेत. स्वत:च्या जीवाची जोखीम पत्करुन, कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून असंख्य परिचारिका भगिनी आज दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहेत. शहरी, ग्रामीण, दुर्गम भागात कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपूरे आहेत, अशा भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:42 AM 12-May-20
