रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर १२ ऑगस्टपर्यंत कायम

0

रत्नागिरी : गेला आठवडाभर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, पावसाचा हा जोर १२ ऑगस्टपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. त्यानुसार प्रशासनाने किनारी आणि दुर्गम भागात सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ११ कोटी रुपयांची हानी झाली असून पावसाने सरासरीही पूर्ण केली आहे. दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावणारा मोसमी पाऊस कोकणात सक्रीय झाल्यानंतर ३० दिवसाआधीच आघाडी घेत पावसाने सरशी साधली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने ३३३७ मि. मी. मजल मारली. शासकीय निकषानुसार सरासरी पूर्ण केली आहे. गतवर्षी याच कालावधीत पावसाने अडीच हजार मिमीपर्यंत मजल मारली होती. स्कायमेट आणि हवामान विभाग यांच्या अंदाजामध्ये तफावत असली तरी या वर्षी सरासरी ९० ते ९५ टक्के पाऊस पडण्याची अटकळ खरी ठरली आहे. राज्यभर चौखूर उधळलेल्या पावसाने कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये शंभरी पार केली आहे. जुलै महिन्यात पिछाडीवर असलेल्या पावसाने ऑगस्टच्या पहिल्या टप्प्यातच सरासरी पूर्ण केली आहे. साधारणपणे रत्नागिरी जिल्हयात साडेतीन हजार मि.मी. पाऊस पडतो. शासकीय निकषानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ३३३७ मि.मी. पाऊस पडतो. हे पर्जन्यमान रत्नागिरी जिल्हयात पूर्ण झाले आहे. जुलैमध्ये पहिल्या टप्प्यात मान्सून सक्रीय झाल्यानंतर तिवरे धरण फुटीच्या दुर्घटनेत राज्यभर हाहाकार माजवला. दरम्यान, ऑगस्ट महिन्यामध्ये अद्यापही पावसाचा जोर कायम राहणार असून, १२ ऑगस्टपर्यंत अति मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. त्यानुसार प्रशासनाने दुर्गम भागात आणि किनारी भागात सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here