कोरोनाशी खरी लढाई फक्त राज्य सरकारे करत आहेत; केंद्र सरकारची मात्र दादागिरी : जितेंद्र आव्हाड

मुंबई : ‘कोरोनाशी खरी लढाई फक्त आणि फक्त राज्य सरकारे करत आहेत. मोदी सरकार मात्र कुठलीही आर्थिक मदत न करता अभ्यास पथकं पाठवून राज्य सरकारांवर दादागिरी करत आहे,’ असा घणाघाती आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. करोनामुक्त झालेल्या आव्हाड यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर हल्ले सुरू केले आहेत. ‘पंतप्रधान टीव्हीवर येऊन नाट्यमय घोषणा करताहेत. पण प्रत्यक्षात लढाई राज्य सरकारं लढत आहेत. उलट सर्व आर्थिक नाड्या आपल्या ताब्यात ठेवून राज्य सरकारच्या कामकाजाला खीळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रं, जिल्हा परिषदांची रुग्णालयं यांचं भक्कम जाळं निर्माण झाल्यामुळंच आज आपला संघर्ष सुरू आहे. मात्र, आज एक प्रकारचं आर्थिक अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघराज्य पद्धतीचा ढाचा खिळखिळा करून, संसदीय लोकशाही मोडून अध्यक्षीय व्यवस्था आणण्याचा डाव दिसू लागला आहे,’ असा थेट आरोप आव्हाड यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here