रत्नागिरी : कोरोनाच्या लॉकडाऊन पायी सर्व काही ठप्प होऊन पडले आहे. अशातच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका प्रशासकीय यंत्रणेला मदत करत आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या २७ रुग्णवाहिका सर्व ठिकाणी मोफत कार्यरत आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याची ही मोफत रुग्णवाहिका सेवा गेली दहा वर्षे सुरू आहे. त्यांच्यामुळे आतापर्यंत १३ हजारांवर अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यास मदत झाली आहे. कोरोनामुळे आज सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य सेवेवरील ताण वाढत आहे. या काळात संस्थानची ही सेवा अविरत सुरू आहे. आज या सर्व रुग्णवाहिका कोणत्याही प्रसंगाला धावून जात आहेत. कोरोना संशयितांना रुग्णालयात दाखल करणे, रुग्णालयातून पुन्हा त्यांच्या गावी सोडणे, अपघात स्थळी दाखल होऊन त्यांना नजीकच्या दवाखान्यात दाखल करणे, आदी कामांसाठी या रुग्णवाहिका तत्परतेने पुढे येत आहेत. त्यांच्या या तत्परतेने प्रशासनाला मोलाची मदत होत आहे. ठप्प असलेल्या या लॉकडाऊन काळात या रुग्णवाहिकेंचे काम कौतुकास्पद ठरत आहे.
