‘वंदे भारत मिशन’अंतर्गत आतापर्यंत ६०३७ भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये विविध देशांत अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने ‘वंदे भारत मिशन’ मोहीम सुरू केली आहे. ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसला ७ मे २०२० पासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ३१ उड्डाणे करत ६०३७ भारतीयांना मायदेशात परत आणण्यात यश आले, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने सांगितले. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत १२ देशांमध्ये ६४ विमान उड्डाणे करीत आहे. यामध्ये एअर इंडियाची ४२ उड्डाणे आणि २४ उड्डाणे एअर इंडिया एक्स्प्रेस करत आहे. या १२ देशांमध्ये अमेरिका, लंडन, बांगलादेश, सिंगापूर, सौदी अरेबिया, कुवैत, फिलिपिन्स, युएई आणि मलेशियाचा समावेश आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशात अडकलेल्या १४,८०० भारतीयांना पहिल्या टप्प्यात परत आणले जाईल. वंदे भारत मिशनमुळे अनेक नेत्यांनी भारत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या परतीसाठी सात मेपासून सुरु करण्यात आलेली विशेष विमान उड्डाणे टप्प्या-टप्प्याने चालूच राहतील. ही उड्डाणे ३१ मे पर्यंत चालूच राहण्याची शक्यता आहे, असे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रवासी निर्बंधामुळे अमेरिकेत अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि लोकांची संख्या पाहता येत्या आठवड्यात विमान उड्डाणांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यातच, अमेरिकेत भारतीय दूतावासाने नुकतीच मायदेशात परतण्याच्या विचारात असलेल्या भारतीयांची यादी तयार करण्यास सुरवात केली. यासाठी ऑनलाइन नोंदणीद्वारे यादी तयार केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here