सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीची जोडी, हे सर्वांनाच ज्ञात आहे. 1996-97च्या नंतर या सलामीवीरांनी वन डे क्रिकेट गाजवलं आणि त्यांनी केलेला विक्रम आजही अबाधित आहे. तेंडुलकर आणि गांगुली यांनी 176 वन डे डावांत 47.55 च्या सरासरीनं 8227 धावा केल्या. 2001मध्ये केनियाविरुद्ध त्यांनी 258 धावांची सर्वोत्तम भागीदारी केली.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) मंगळवारी तेंडुलकर-गांगुली यांच्यातील एक विक्रम पोस्ट केला. ”वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही जोडीला मिळून 6000 धावा करता आलेल्या नाहीत.” आयसीसीच्या या पोस्टवर उत्तर देताना तेंडुलकरनं माजी कर्णधाराला प्रश्न विचारला. तेंडुलकरनं लिहिलं की,”या फोटोनं जुन्या काळात नेलं. वर्तुळाबाहेर चार खेळाडूंचा नियम आणि दोन नवीन चेंडूंसह आपण आणखी किती धावा केल्या असत्या?” असा प्रश्न तेंडुलकरनं केला. त्यावर गांगुलीनं उत्तर दिलं की,” 4000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा नक्की केल्या असत्या. दोन नवीन चेंडूंसह पहिल्या षटकापासून कव्हर ड्राईव्हवरून चौकार मारला असता आणि 50 षटकांपर्यंत तसाच खेळ कायम राहिला असता. ”तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमध्ये 463 सामन्यांत 18426 धावा केल्या आहेत आणि त्यात 49 शतकांचा समावेश असून नाबाद 200 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. गांगुलीनं 311 वन डेत 41.022 च्या सरासरीनं 22 शतकांसह 11363 धावा केल्या आहेत.
