रत्नागिरी : गेले आठवडाभर रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपून काढले. यामुळे काजळी, मुचकुंदी या मोठ्या नद्यांसह तालुक्यातील अनेक भागांतून वाहणाऱ्या छोट्या नद्या, मोठे वहाळ यामुळे पुराचे पाणी घुसून अनेक घरे, गोठे यांना फटका बसला. तालुक्यातील ७६२ कुटुंबांना पाण्यामुळे सुमारे २ कोटी २६ लाख ७० हजारांचे नुकसान सोसावे लागले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे तहसील पातळीवरून झाल्याची माहिती तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड, राजापूर या तीन तालुक्यांत पावसाचा कहर सुरू असताना रत्नागिरी तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, गत आठवड्यात पावसाने रत्नागिरी तालुक्यातील सरासरी भरून काढली. आठवडाभर विविध भागांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. काजळी व मुचकुंदी नद्यांबरोबरच तालुक्यात अन्य गावांमधून वाहणाऱ्या छोट्या नद्याही दुथडी भरून वाहत होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी भरले. पुरामुळे सव्वा दोन कोटींचे नुकसान काजळी व मुचकुंदी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांचे व दुकानांचे मोठे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यात एकट्या चांदेराई गावातच एक कोटीच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. रत्नागिरी तालुक्यातील नुकसान आकडेवारीनुसार हरचिरीमध्ये ८१ कुटुंबांचे १०,३२,३८० रुपयांचे नुकसान झाले आहे.
