➡️ सर्वांच्या सहकार्यातून कोरोना संकटावर नक्कीच मात करु
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात परिस्थिती पूर्णपणे सकारात्मक पध्दतीने हाताळण्यात येत असून नागरिकांच्या सहकार्याच्या बळावर या आपत्तीचा मुकाबला करताना प्रशासन खंबीर आहे, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले. रत्नागिरीत अडकून पडलेल्या परप्रांतातील व्यक्तीना त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने मार्च अखेर नियोजन निधी परत न जाऊ देता साधारण 7 कोटींचा निधी आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी यासाठी उपलब्ध करून दिला. यातून अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधांच्या खरेदीत मोठी मदत झालेली आहे. सर्वांच्या सहकार्यातून संकटावर मात करु असा दृढनिश्चय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद असतानाही काही जण छुप्या मार्गांनी जिल्ह्यात आले. अशा सर्वांचा शोध घेऊन त्यांना सर्वांना संस्थात्मक पद्धतीने क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाला कोव्हीड रुग्णालयात रूपांतरित करून 400 खाटांची सुसज्ज व्यवस्था करण्यात आलेली आहे. शासन व कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून व्हेंटीलेटर खरेदी व खाजगी डॉक्टरांशी करार आदी पार पडले असून येणाऱ्या काळातील आव्हानांचा मुकाबला करण्याची पूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे. फक्त मुंबईतून येणारी लोकं आपल्या नियंत्रणात नाहीयेत. बाकी सगळ्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे व्यवस्थित नियंत्रण आहे. आपण सर्वांच्या सहकार्यातून कोरोना संकटावर नक्कीच मात करु, कुणीही घाबरून जाऊ नका, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.
