राज्यात १४ मेपासून अटी-शर्तींसह घरपोच दारूविक्री

मुंबई : राज्य सरकारनं मद्यप्रेमींना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. येत्या १४ तारखेपासून परवाना असलेल्या मद्य दुकानांना घरपोच दारूविक्री करता येणार आहे. काही अटी-शर्तींवर घरपोच दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारनं वाइन, बिअरची दुकाने खुली ठेवण्यास काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र, दुकानांसमोर मोठी गर्दी होत होती. त्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे समोर आले होते. याशिवाय पोलीस विभागांवर अतिरिक्त जबाबदारी आली होती. त्यामुळं अनेक जिल्ह्यांत वाइन शॉप, मद्यविक्रीची दुकानं खुली ठेवण्यास विरोध झाला होता. मात्र, आता राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ तारखेपासून घरपोच दारू दिली जाणार आहे. पण त्यासाठी काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. कन्टेन्मेंट झोन वगळता सर्वत्र घरपोच दारू देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.दारूच्या दुकानांतून घरपोच मद्य देणारा डिलिव्हरी बॉय ‘फिट’ आहे का, याची तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत केली जाणार आहे. त्यानंतरच त्याला घरपोच दारू देण्यास परवानगी दिली जाणार आहे. जे दुकानमालक उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधतील, त्यांनाच परवानगी दिली जाईल. तसंच संबंधित डिलिव्हरी बॉयला विभागाकडून ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यालाच मद्याची वाहतूक करता येणार आहे.

‘या’ अटींवर घरपोच दारूविक्री


▪️ कन्टेन्मेंट झोनमध्ये घरपोच सेवा दिली जाणार नाही
▪️ परवानाधारक मद्यविक्री दुकानदारांनाच घरपोच दारू देता येणार आहे.
▪️ नमूद केलेल्या दिवशी आणि वेळेवर परवानाधारक विदेशी मद्याची विक्री आणि वितरण केवळ त्याच्या परिसरात करेल.
▪️ परवानाधारकानं संबंधित मद्याच्या विक्रीसाठी मागणी नोंदवली असेल तरच, त्याला दारूची विक्री परवानाधारकाच्या निवासी पत्त्यावर करता येईल.
▪️ घरपोच सेवा देणारे डिलिव्हरी बॉय मास्कचा वापर, वेळोवेळी हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करतील याची खबरदारी परवानाधारक घेतील.


राज्य सरकारनं आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ (२००५ चा ५३वा कायदा) किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले लॉकडाऊनचे आदेश अस्तित्वात असेपर्यंत हे आदेश लागू असतील.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here