रत्नागिरी : भल्या पहाटे झालेल्या स्फोटाने रत्नागिरी शहर हादरले

सिलेंडर स्फोटात ४ जखमी तर दोन महिला घरातच अडकल्या

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शेट्ये नगर येथे आज सकाळी पाचच्या सुमारास शेटे नगर येथील घरात सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की या स्फोटाचा आवाज तब्बल दोन किलोमीटर पर्यंत ऐकू गेला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेटे नगर येथील अश्फाक काझी यांच्या घरात हा अपघात झाला. अश्फाक काझी हे रिक्षा चालक आहेत. पहाटे पाच वाजता ते नेहमीप्रमाणे उठले असता त्यांनी घरातील लाईट लावले व नेमके त्याच वेळी हा स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. या स्फोटात अश्फाक काझी यांच्या घरातील दोन जण जखमी झाले असून दोन महिला अद्यापही घरातच अडकल्या आहेत. या घरात सिलेंडर चा स्फोट झाल्यावर या घराचा स्लॅब देखील कोसळला. यामुळे या घरातील दोन महिला आतच अडकून पडल्या. याच घराच्या शेजारी राहणाऱ्या दोघांना देखील या अपघातामुळे इजा झाली आहे. स्फोट एवढा मोठा होता की या घराच्या शेजारी असणाऱ्या घरांच्या खिडकीच्या काचा देखील फुटल्या. सुमारे दोन किलोमीटर दूरवर या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. या पडलेल्या घरात अडकलेले दोन महिलांना काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या मदतीने सुरू असून परिसरातील नागरिक देखील मदतीला धावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here