विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढत दिले जीवदान

राजापूर : तालुक्यातील हसोळतर्फे सौंदळ येथील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली. महंमंद मिर हे विहिरीचे पाणी सोडण्यासाठी गेले असताना त्यांना विहिरीत आत बिबटया पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत गावात माहिती दिली. त्यानंतर मिर यांनी राजापूर वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने विहिरीत पिेंजरा सोडून या बिबट्याला बाहेर काढले. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला तात्काळ नैसर्गिक अधिवासात सोडले. याप्रसंगी गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. विभागीय वनअधिकारी रमाकांत भवर, परिक्षेत्र वनअधिकारी प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक संजय रणधीर यांसह सहकारी दिपक चव्हाण, दिपक म्हादये, विजय म्हादये यांनी बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. सुमारे एक ते दिड वर्षे वयाची मादी असून भक्ष्याच्या पाठलाग करत असताना ती विहिरीत पडली असावी असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here