न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न पुढील महिन्यात देणार राजीनामा

0

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांनी पक्षाच्या वार्षिक बैठकीत लवकरच राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान पदावर राहून जबाबदारी पार पाडण्याची शक्ती आता माझ्याकडे नाही, त्यामळे मी लवकरच राजीनामा देणार आहे, असे म्हणत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. जसिंडा यांच्या या घोषणेनंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान जसिंडा अर्डर्न या पुढील महिन्यात राजीनामा देणार आहेत.

म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला : जसिंडा अर्डर्न

मीडिया रिपोर्टनुसार, जसिंडा अर्डर्न म्हणाल्या की, “आता ती वेळ आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विचार केला. माझ्याकडे खरचं देशाचे नेतृत्व करण्याची शक्ती आहे का? तर मला याचे उत्तर नाही मिळाले. म्हणून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी राजीनामा देत आहे कारण पंतप्रधानपद हे अनेक जबाबदाऱ्यांसह येते. आपण ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम आहोत की नाही ही ओळखण्याची जबाबदारी आपली आहे. मी आता ही जबाबदारी पाडण्यासाठी सध्या सक्षम नाही, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे.”

आता ती वेळ आली आहे…. : जसिंडा अर्डर्न

वर्षाच्या शेवटी न्यूझीलंडमध्ये निवडणुका होणार आहेत. जसिंडा अर्डर्न हे नाव गेली काही वर्ष जागतिक राजकारणात आघाडीच्या नावांमध्ये कौतुकाने घेतलं जातं. अर्डर्न पुढे म्हणाल्या, “राजकीय नेता देखील शेवटी माणूसच आहे. जोपर्यंत आमच्यावर जबाबदारी आहे. ती जबाबदारी चोख पाडण्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या आम्ही केल्या. परंतु आता ती वेळ आली आहे.”

न्यूझीलंडचे लोक त्यांचे नेतृत्व कसे लक्षात ठेवतील असे विचारले असता पंतप्रधान जसिंंडा अर्डर्न म्हणाल्या की,, “मला आशा आहे की न्यूझीलंडचे नागरिक मी घेतलेल्या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील. खरा नेता तो आहे ज्याला पद सोडण्याची योग्य वेळ कळते. मी सहृदय आहे; पण याचा अर्थ मी कमकुवत आहे, असा मुळीच नाही. एकाच वेळी तुम्ही सहृदय असू शकता आणि कणखर देखील…”

2017 मध्ये जसिंडा अर्डर्न न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या

जसिंडा अर्डर्न 2017 मध्ये न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्या पुन्हा सत्तेत आल्या. जागतिक राजकारणात आघाडीच्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव कौतुकाने घेतलं जातं. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले. क्राइस्ट चर्च परिसरातील मशिदींवरील हल्ला आणि व्हाईट आयलंड ज्वालामुखीचा उद्रेक चांगल्या पद्धतीने हातळल्याबद्दल देखील त्यांचे कौतुक झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here