रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढलेली संख्या पाहता जिल्ह्यात तात्काळ कोरोना तपासणी लॅब सुरु करावी, अशी मागणी रत्नागिरी कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष राकेश अनंत चव्हाण यांनी राज्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात मागील ८-१० दिवसांत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५०च्या वर जावून पोहचली आहे. शासनाने चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी परवानगी दिल्याने कित्येक चाकरमानी गावाकडची वाट धरत आहेत. परिणामी जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारे कोरोनाचे रुग्ण आणि मुंबईहून गावी येणाऱ्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांची संख्या पाहता जिल्ह्यातच कोरोना तपासणी लॅब अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यात तपासणीसाठी मोठ्या संख्येने घेतले जाणारे संशयितांचे नमुने व मिरज येथून तपासणी अहवाल येईपर्यंत ३-४ दिवसाची वाट पहावी लागते. कोरोना अहवाल वेळेत मिळणे आवश्यक आहे. आधीच विलगीकरण कक्षात सोयी सुविधांची वानवा आहे. जिल्ह्यात स्वॅब टेस्टिंग लॅब सुरु झाल्यास तात्काळ रिपोर्ट मिळण्यास मदत होईल. त्यामुळे निगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करून विलगीकरण कक्षातील भार कमी करता येईल, तरी जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्ह्यात तात्काळ लॅब सुरु करण्यास प्राधान्य द्यावे, अशी रत्नागिरी कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात यांना केली आहे.
