राजापूर : गेले काही दिवस पाचलमध्ये डेंग्यूचे रूग्ण सापडत असल्याने खळबळ उडाली. दरम्यान, आरोग्य विभागाने स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने योग्य ती उपाययोजना त्वरित केल्याने डेंग्यूवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. सध्या पाचलमध्ये एकही डेंग्यूचा रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सुमारे दीड महिन्यापूर्वी काही रुग्ण सापडले होते त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने पाचल ग्रामपंचायतीच्या सहकार्याने त्या परिसराची फवारणी केली होती. परीसराची स्वच्छता करण्यात आली होती. मात्र, आठ दिवसांपूर्वी पाचलमध्ये डेंग्युचे आठ रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली. दरम्यान, त्या आठही रुग्णांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, त्यानंतर अधिक उपचारार्थ त्यांना कोल्हापूर, रत्नागिरी येथे हलविले गेले. तेथे यशस्वी उपचार झाले असून त्या सर्व रुग्ण बरे झाले आहेत.
