एका राज्याचा मुख्यमंत्री कसा काम करु शकतो, हे एकनाथ शिंदेंनी अखंड विश्वाला दाखवून दिले : उद्योगमंत्री उदय सामंत

0

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे डाव्होस दौरा अर्ध्यावरच सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माघारी फिरले. तर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डाव्होस येथे थांबले होते.

उदय सामंत राज्यात परतले असून, डाव्होस दौऱ्याची सविस्तर माहिती देताना, एका राज्याचा मुख्यमंत्री कसा काम करु शकतो, हे एकनाथ शिंदेंनी अखंड विश्वाला दाखवून दिले, असे कौतुकोद्गार उदय सामंत यांनी काढले.

पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डाव्होसला येण्यासाठी काहीसा उशीर झाला. तरीही त्यांनी आल्यानंतर ज्या गतीने काम केले. ती गती अशीच ठेवली तर वेदांता फॉक्सकॉन, एअरबस पेक्षाही मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील. तसेच परत भारतात येत असताना विमानात उद्योगपती जिंदाल यांची भेट झाली. त्यांनी महाराष्ट्रात दहा हजार कोटींचा इलेक्ट्रिक मोटर व्हेईकलचा प्रकल्प महाराष्ट्रात उभारू, असे सांगितले, अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी बोलताना दिली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डाव्होसला येऊ शकले नाहीत. मात्र ते सतत आमच्या संपर्कात होते. दिवसातून दोन – तीन वेळा आमच्याशी फोनवर बोलून ते आमच्याशी संवाद साधत होते. सामंजस्य करार किती झाले, यासोबतच आमच्या तब्येतीचीही काळजी ते घेत होते. आमच्यासोबतच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची काळजी घेणारा उपमुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळाला आहे, असे उदय सामंत यांनी नमूद केले. डाव्होसमध्ये दोन किलोमीटर परिसरात जागतिक आर्थिक परिषदेचे शिबीर भरले होते. याठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमेव होर्डिंग्ज लागले होते. अन्य देशांच्या प्रमुखाचे होर्डिंग्ज नव्हते. महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनमध्ये अनेक देशांचे प्रमुख, भारतातील अन्य मुख्यमंत्री आणि उद्योजक भेट देत होते.

मुख्यमंत्र्यांचे डाव्होसमधील वास्तव्य हे फक्त २८ तासांचे होते. पण या २८ तासांत महाराष्ट्रात ते ज्या गतीने काम करतात, त्याच्या दुप्पट गतीने डाव्होसमध्ये काम करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्यमातून अखंड विश्वाला दाखवून दिले की, एका राज्याचा मुख्यमंत्री कसा काम करु शकतो, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 20-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here