मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षावाले, टॅक्सीवाले, खासगी बसेस आणि जड वाहनांच्या लहान-मोठ्या कंपन्या, ही वाहनं चालवणारे ड्रायव्हर्स, क्लिनर्स अशा सर्वांवरच परिणाम झालाय. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिपत्रक काढून परिवहन विभागाकडे काही मागण्या केल्या आहेत. पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही मोटर वाहन कर, पार्कींग शुल्क माफ करा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना यासंदर्भात एक पत्र लिहीले आहे. पंजाब सरकारने १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या वाहनांवरील मोटर वाहन कर माफ केलेला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही मोटर वाहन कर माफ व्हायलाच हवा, अशी मागणी मनसेने केली आहे. हा कर माफ केल्यास स्टेज कॅरेज बसेस, टुरिस्ट बसेस, शाळा बसेस, मिनी बसेस, मॅक्सी कॅब, तीन चाकी वाहनं, मालवाहतुकीची वाहनांना दिलासा मिळणार आहे.
