खेड : कोरोना प्रादुर्भावामुळे बाहेर गावाहून असंख्य चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. मुंबई येथून चालत गावी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशाचप्रकारे दिवा-मुंबईतून ७ दिवस पायी प्रवास करत गावी येणाऱ्या ३४ जणांना पोलिसांनी तुळशी फाटा येथे अडवत आरोग्य प्रशासनाच्या स्वाधीन केले. यामध्ये दोन चिमुरड्यांचाही समावेश आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन करण्यात आले आहे. कशेडी येथे पोलीस पकडतील या भीतीपोटी अनेक चाकरमानी कशेडी घाटाला पर्याय असलेल्या विन्हेंरे घाटातून येण्याचा मार्ग पत्करत आहेत. मात्र पोलिसांनी मोक्याच्या मार्गावर गस्त वाढवल्याने चकवा देणारे चाकरमानी कचाट्यात अडकत आहेत.
