गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास ग्राहकांना मिळू शकते ५० लाखांपर्यंत नुकसानभरपाई

0

अश्फाक काझी आणि बाधित कुटुंबाना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पत्रकार हेमंत वणजु आणि त्यांची लिगल टीम काम करणार

गॅस कंपनीला देण्यात आले याबाबतचे पत्र

➡️ रत्नागिरी : दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी येथील शेट्ये नगर येथे एक दुर्दैवी घटना घडली. यात दोघांचा मृत्यू तर चारजण जखमी झाले. अश्फाक काझी यांच्या घरासोबतच शेजारील घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन अपघात घडल्यास ग्राहकाला ५० लाखांपर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते. यासाठी पेट्रोलियम कंपनी कडून ग्राहकांचा विमा काढण्यात येतो. मात्र या विम्याबाबत फार कमी ग्राहकांना माहित आहे. सध्या अश्फाक काझी यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरु आहेत. अश्फाक काझी यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे विम्याबाबत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती असणारे कुणीच नाही. अश्फाक काझी आणि इतर बाधित कुटुंबियांना गॅस कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी पत्रकार हेमंत वणजु आणि त्यांच्या लिगल टीमने पुढाकार घेतला आहे. अपघाताची घटना घडल्यावर पाच दिवसांच्या आत गॅस कंपनीला लेखी कळवणे आवश्यक आहे. मात्र अश्फाक यांच्या कुटुंबातील माहितगार व्यक्ती रत्नागिरीत नसल्याने पत्रकार हेमंत वणजु यांनी स्वतः पुढाकार घेत गॅस कंपनीला पत्र दिले आहे. याचसोबत रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांना देखील या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे. पोलिसांचा अधिकृत रिपोर्ट आल्यावर आम्ही याबाबत कारवाई करू असे तहसीलदार यांनी सांगितले आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत बाधित कुटुंबियांना नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी पत्रकार हेमंत वणजु आणि त्यांची लिगल टिम काम करणार आहेत.

काय आहे हा विमा ?
प्रत्येक पेट्रोलियम कंपनी आपल्या ग्राहकांच्या सुरक्षितेसाठी एखाद्या विमा कंपनीकडे एल पी जी विमा काढत असते. गॅस कंपनी कडून ग्राहकाने कनेक्शन घेतल्यावर त्या ग्राहकाला हा विमा लागू होतो. जर गॅसचा स्फोट होऊन एखादा अपघात घडल्यास विमा कंपनीकडून ग्राहकाला तातडीची नुकसानभरपाई म्हणून २५००० हजार रुपये, याचसोबत मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई, मालमत्ता नुकसानभरपाई व वैद्यकीय खर्च असे एकूण ५० लाखांपर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते. याची माहिती बहुतांशी ग्राहकांना नसते शिवाय गॅस कंपन्या देखील याबाबत ग्राहकांना माहिती देत नाहीत. हि नुकसानभरपाई मिळवण्यासाठी अपघात घडल्यावर पोलिसांना व गॅस कंपनीकडे याबाबत लेखी तक्रार देणे आवश्यक आहे. यानंतर पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी जागेवर येऊन घटनेचा पंचनामा करतात. अपघातात मृत व्यक्तींचा शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय उपचारांची बिले आदी इतर सर्व कागदपत्रे विमा कंपनीला द्यावी लागतात. त्यानंतर हा अपघात गॅस सिलिंडर स्फोटामुळेच झाल्याचे निष्पन्न झाल्यावर ग्राहकाला हि नुकसानभरपाई मिळते.

हि सर्व धावपळ व आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अश्फाक यांचे नातेवाईक सक्षम नाहीत. म्हणूच एक सामाजिक जबाबदारी व मदतीच्या हेतूने पत्रकार हेमंत वणजु आणि त्यांच्या लिगल टीमने या सर्व पूर्ततेत पुढाकार घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 21-Jan-23

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here