बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोड केली नाही, मुख्यमंत्रीपदासाठी विचार सोडले नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

0

मुंबई : सत्तेसाठी बाळासाहेबांनी कधीही तडजोड केली नाही, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही, आज त्यांचाच विचार ऐकून आम्ही काम करतोय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

बाळासाहेब रिमोट कंट्रोल चालवायचे, पण ते दुसऱ्यासाठी, स्वत:ला काही पाहिजे म्हणून त्यांनी कधीही रिमोट कंट्रोल चालवला नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधान भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

एकदा शब्द दिला की तो पाळायचाच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार ऐकताना आजही उर्जा मिळते, प्रेरणा मिळते. एकदा शब्द दिला की तो फिरवायचा नाही ही बाळासाहेबांची शिकवण, आम्ही ती पाळली. बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आणि गुरुही होते. आज आनंद दिघे असते तर त्यांना अभिमान वाटला असता. बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि ठाण्यात त्याचं पालन व्हायचं. ठाणं आणि शिवसेना हे नातंच वेगळं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वयाच्या 16 व्या वर्षापासून मी बाळासाहेबांसोबत काम केलं, त्यांची भाषणं ऐकली. आज त्यांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं. आज मी मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्यात येतंय हा दुर्मिळ क्षण आहे. एकेकाळी महाराष्ट्रात प्रस्थापितांची सत्ता होती, बाळासाहेबांनी सर्वसामान्यांपर्यंत ही सत्ता पोहोचवण्याचं काम केलं. कुणालाही राजकीय पार्श्वभूमी नसताना, बाळासाहेबांनी त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री केलं. एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री आहे, ही जादू फक्त बाळासाहेबांचीच आहे.

आनंद दिघेंचा मृत्यू झाल्यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पाकिस्तान कुणालाही घाबरत नव्हता, पण तो फक्त बाळासाहेबांना घाबरायचा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एवढं मोठं उत्तुंग व्यक्तीमत्त्व असतानाही नागरिकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडेही बाळासाहेब लक्ष द्यायचे, त्यामुळेच गेली 25 वर्षे ठाण्याची सत्ता ही बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेब नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगातली कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, आता त्याचा अनुभव आम्ही घेतोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मी सूर्याचा भक्त आहे, सूर्य ज्यावेळी आकाशात उगवतो त्यावेळी सगळीकडे भगवा रंग पसरतो, तोच आता जगात पसरल्याचं पाहायचं आहे असं बाळासाहेब म्हणायचे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेब मुस्लिमांच्या विरोधात नव्हते, पण देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना मात्र त्यांनी सोडलं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 24-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here