मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला तुरुंगात टाकण्याचं टार्गेत तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलं गेलं होतं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंसोबतच्या राजकीय वैरामुळे वैयक्तिक मैत्री देखील संपुष्टात आलीय का? याबाबत बोलत असताना फडणवीसांनी आपल्या मनातली भावना बोलून दाखवली. मी कधीच राजकीय वैर मनात ठेवत नाही. उद्धव ठाकरेंनीच मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद केले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एका वृत्त वाहिनीनं आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. “उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझं आजही त्यांच्याशी कोणतंही वैर नाही. मनात कोणतीही कटुता नाही. पण पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं. त्यांनी माझा एक फोनही उचलला नाही. त्यांनी सौजन्य म्हणूनही माझ्याशी बोलणं योग्य समजलं नाही. उलट गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असं टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते”, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
आम्हाला चॅलेंज देण्याआधी इतिहास पाहा…
आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो तुम्ही मोदींचा लावा बघू लोक कुणाच्या पाठिशी उभं राहतात असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिलं. “आम्हाला चॅलेंज द्यायचं राहू द्यात. आधी तुम्हीच मोदींचे फोटो लावून निवडून आलात ना? २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या बॅनरवर बाळासाहेबांपेक्षाही मोदींचा मोठा फोटो तुम्हीच छापून निवडून आला होता. बाळासाहेब आजही आमचे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही”, असं फडणवीस म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 24-01-2023
