गणपतीपुळे येथे उद्या माघी यात्रा उत्सव

0

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे उद्या बुधवार दिनांक २५ जानेवारी रोजी माघी यात्रा उत्सव साजरा होणार असून या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक भाविकांचा मोठा जनसागर लोटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

HTML tutorial

“माघी यात्रा” ही स्थानिकांची म्हणून ओळखली जाते. दरवर्षी या यात्रेसाठी गणपतीपुळे तीर्थक्षेत्राबरोबर नजिकच्या मालगुंड, भगवतीनगर, वरची निवेंडी, वरवडे, भंडारपुळे, नेवरे कोतवडे आदी ठिकाणच्या स्थानिक भाविकांबरोबरच खंडाळा, जयगड व संपूर्ण रत्नागिरी तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून स्थानिक भाविक दर्शनासाठी व माघी यात्रेसाठी येत असतात. मागील कोरोनाच्या दोन वर्षांतील टाळेबंदीमुळे माघी यात्रा उत्सव संपन्न झाला नव्हता. मात्र यावर्षी माघी यात्रा उत्सव साजरा होत असल्याने स्थानिक भाविकांमध्ये आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच, संस्थांन श्री देव गणपतीपुळेच्या देवस्थान समितीमार्फत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. माघी यात्रेनिमित्त उद्या स्थानिकांसाठी मंदिर पहाटे दर्शनासाठी उघडणार असून स्थानिकांना दर्शन रांगेतून दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. तसेच या निमित्ताने सायंकाळी चार वाजता स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गे वाजत गाजत व ढोल ताशांच्या गजरात निघणार आहे. यावेळी देवस्थानची सर्व प्रमुख पंचमंडळी, मुख्य पुजारी, कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

एकूणच माघी यात्रेसाठी गणपतीपुळे तीर्थक्षेत्र सज्ज झाले आहे. या निमित्ताने गणपतीपुळे देवस्थान समितीमार्फत व गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्यावतीने स्थानिक भाविकांच्या सोयीसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच माघी यात्रेसाठी जिल्ह्यातील स्थानिक दुकानदारांबरोबरच घाटमाथ्यावरील दुकानदार दाखल झाले आहेत. त्यामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्राला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 24-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here