जत : जिल्हाबंदीमुळे आईची भेट न झाल्यामुळे जिव्हारी लागलेल्या १५ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रत्नागिरी येथे घडली. प्रशांत भाऊसाहेब थोरात असे या मुलाचे नाव आहे. हा मूळचा बाज (ता.जत) येथील आहे. लॉकडाऊन जिल्हाबंदीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. त्यासाठी परवानगी हवी असेल तर नियम व अटी लागू आहेत. बाज येथील थोरात कुटुंबीय रत्नागिरी येथे कामानिमित्त राहतात. प्रशांतचे वडील रत्नागिरी येथे असतात तर आई बाज येथे राहते. प्रशांत याला घरी जाण्याची ओढ लागली होती. मला आईकडे घेऊन चला, असे तो वडिलांना वारंवार सांगत होता. परंतु नियम व अटीमुळे या कुटुंबाकडे कोणताही पर्याय नव्हता. दरम्यान वडील अत्यावश्यक सेवेसाठी ट्रकचालक म्हणून गेले होते. जत येथे जाण्यासाठी त्यांनी गाडीची चौकशी केली होती; परंतु त्या आधीच प्रशांतने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह बाज येथे आणण्यात आला. तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत रत्नागिरी पोलिसात नोंद आहे.
