मुंबई : कोरोनानं देशासह देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला वेठीस धरली आहे. मागील दीड महिन्यांपासून या महानगराची जीवनवाहिनी असलेली लोकल ठप्प आहे. मुंबईसमोर कोरोनाबरोबर आर्थिक आव्हानही उभं राहिलं आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे. देशात कररूपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होत होता पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ असल्याचे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
