निकालापूर्वीच विजयाचा दावा करत असतील तर शंकेला वाव : अंबादास दानवे

0

मुंबई : शिवसेना कोणाची याबाबत न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु असून, अजूनही अंतिम निकाल आलेला नाही.

मात्र त्यापूर्वीच निकाल आमच्या बाजूला लागणार असल्याचे शिंदे गटाकडून (Shinde Group) सांगण्यात येत असेल तर शंकेला वाव असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तर न्यायालयात प्रकरण सुरु असल्याने मंत्रीमंडळ विस्तार होणार नसल्याचं देखील दानवे म्हणाले आहे. औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना दानवे म्हणाले की, शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. 16 लोकांनी पक्ष भंग केला आहे. त्यामुळे कारवाई होईल किंवा न्यायालय काय निकाल देईल हे सांगता येत नाही. यामुळे मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही. तसेच सुनावणी सुरु असताना आधीच निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा करत असतील तर शंकेला वाव असल्याचं दानवे म्हणाले. तसेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार 16 जणांवर कारवाई व्हावी हाच कायदा असल्याचं देखील उल्लेख दानवे यांनी केला.

फडणवीसांचे आरोप फेटाळले…

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले जात होते, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केला होता. त्यांच्या याच आरोपाला उत्तर देताना दानवे म्हणाले की, याबाबत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस यांना जेलमध्ये टाकण्याचा कोणतेही षडयंत्र रचण्यात आलेले नव्हतं. असे षडयंत्र भाजपकडून करण्यात येते. ईडीच्या माध्यमातून भाजपने हे असले प्रयत्न केले आहे. उद्धव ठाकरे हे सांमज्यसाने काम करतात. पक्षातील 50 लोकं निघून गेले, मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना देखील आपलं वजन वापरले नाही. ते आपलं वजन वापरू शकत होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे अशा आरोपात तथ्य नसल्याचं दानवे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहिता भंग!

राज्यात होत असलेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात जुनी पेन्शन योजना हा मुद्दा केंद्र बिंदू बनला आहे. दरम्यान रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू असताना अशाप्रकारे मुख्यमंत्री यांनी घोषणा करणे म्हणजेच आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 25-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here