मुंबई-गोवा रस्ता बनणार ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

ठाणे : कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण स्वत: तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबद्ध आहोत. समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर लवकरच मुंबई-गोवा महामार्ग ग्रीनफिल्ड ॲक्सेस कंट्रोल रस्ता बनविणार आहे.

कोकणच्या पर्यटनवृद्धीसाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून कोस्टल रोडचेही रूंदीकरण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली.

कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने सीताराम राणे यांनी ठाण्यातील शिवाईनगरातील उन्नती मैदानात आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. ते म्हणाले की, अशा प्रकारचे महोत्सव म्हणजे खवय्यांसाठी मेजवानी आणि पर्वणी असते. फणस जरी वरून काटेरी असला तरी, आतून तो गोड असतो तशीच कोकणातील माणसे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी महोत्सवाचे कौतुक केले. कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असून बिकट बनलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे तसेच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ग्रीनफिल्ड ॲक्सेस कंट्रोल, असा महामार्ग बनविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

कोकणात पर्यटनाला वाव असल्याने त्यासाठी चांगले इन्फ्रा स्ट्रक्चर व उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होण्यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील कोस्टल रस्त्यांचेही रुंदीकरण करणार आहे. त्यामुळे, सर्व बीच कनेक्ट होऊन पर्यटनवाढीलाही मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सीताराम राणे, स्नेहलता राणे आणि हौसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई आदी उपस्थित होते. शिदे यांच्या रूपाने मालवणी महोत्सवात प्रथमच मुख्यमंत्र्यांची उणीव पूर्ण झाल्याची भावना राणे यांनी व्यक्त केली. यावेळी अनेकांनी मुख्यमंत्र्यांबराेबर सेल्फी काढण्यासाठी त्यांना गराडा घातला हाेता.

आजीच्या कौतुकावरून ठाकरेंना टोला
महोत्सवाच्या सांगता सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील दौंड येथून एसटीने मोफत प्रवास करून ठाण्यात आलेल्या अनुसया नामुगडे या ७५ वर्षीय आजीबाईंचे मुख्यमंत्री शिंदे यांनी काैतुक केले. राणे यांनी आजीबाईंची व्यासपीठावर येऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. त्यावेळी आजींनी, या सरकारने ज्येष्ठांना एसटीमध्ये मोफत प्रवासाची सवलत दिल्यामुळेच आपण ठाण्यात आल्याचे काैतुकोद्गार काढले. त्यावर आतापर्यंत तीन कोटी नागरिकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे सांगत शिंदे यांनी याेजनेचे महत्त्व पटवून दिले. माणसाने घरातून बाहेर पडले पाहिजे तरच तब्येत ठणठणीत राहते, असे सांगून माजी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता टोला लगावला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 25-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here