शेतकरी भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी प्रजासत्ताकदिनी धरणे आंदोलन

0

रत्नागिरी : कोकण हापूस आंबा उत्पादक विक्रेते सहकारी संस्था रत्नागिरी आणि ओबीसी संघर्ष समन्वय समिती यांच्या वतीने आज दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शेतकरी भुमीपुत्रांच्या न्यायहक्कासाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडणार आहेत.

या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्या मागितल्या आहेत. त्यामध्ये 2015 पासून थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 11 हजार 326 आहे व थकीत रक्कम 223 कोटी 86 लाख रुपये आहे. या शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतदारांची संपूर्ण कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करावा. नियमित असणाऱ्या कर्जदारांना पुन्हा व्यवसायात उभे राहण्यासाठी मिनी पॅकेज जाहीर करावे.

शासनाने रत्नागिरी जिल्ह्यात कृषी संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा स्थापन करावी. पीक विम्याचा कोकणातील शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. त्यासाठी दोन मोजणीयंत्र तलाठी सजाला बसवावीत. एक डोंगराळ आणि दुसरे सपाटी भागास असावे. विम्याचे निकष बदलावेत. निकष ठरवताना शेतकऱ्यांच्या संस्थेचा प्रतिनिधी घ्यावा. अवकाळी पावसाचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 7 जूनपर्यंत असावा.

खते, औषधे, पेट्रोल व रॉकेलच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. त्या तात्काळ कमी करण्यात याव्यात. शेतकऱ्याने खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान द्यावे. थकीत शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई सुरू आहे. ती कर्जमाफी मिळेपर्यंत तात्काळ थांबवावी. शून्य वीजचोरी असलेल्या कोकणात पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना योग्य कृषी वीजबिले द्यावीत. भरमसाठ बिले पाठवणे बंद करावे. आंबा हे पीक नाशवंत असल्याने या पिकाला हमीभाव मिळावा. चालू हंगामात फळमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून आंब्याचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी. कोकणातील सर्व बँकांकडून आंबा, काजू, नारळ व सुपारी उत्पादकांना कमी व्याजदरात कर्जे द्यावीत. कोकणातील आंब्याचे माकडामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे माकडांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा अशा मागण्यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 26-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here