मुंबई : दहावी व बारावी उत्तरपत्रिका तपासणीसाठी लॉकडाऊन मधील संचारबंदीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नियामक यांना शिथिलता देण्याचे पत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने सर्व जिल्ह्यातील आयुक्त, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. त्यानंतर आता शाळांमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिका तपासणीसाठी पोहचाव्यात यासाठी मंडळाकडून पोस्टाची मदत घेण्यात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या औषधांची ने आण करणे पोस्टाची प्राथमिकता आहे. मात्र मंडळाची विनंती मान्य करून पोस्टाकडून उत्तरपत्रिका ने आण करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तसेच मुंबई विभागीय मंडळाकडून कार्यवाही सुरु झाली असून त्यासंबंधित विनंती पत्र ही मंडळाने पोस्टाला दिले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली.
