९६व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन; समारोप उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत

0

नागपूर : वर्धा येथे दि. ३, ४ व ५ फेब्रुवारीला होणाऱ्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सविस्तर कार्यक्रम पत्रिका संमेलन अगदी आठ-नऊ दिवसांवर येऊन ठेपले असताना बुधवारी जाहीर करण्यात आली.

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे, तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

संमेलनातील सहभागी निमंत्रितांची नावे पाहिल्यास त्यात साहित्यिकांपेक्षा राजकीय नेत्यांचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेते असावे की नसावे, यावरून पुन्हा वाद निर्माण होऊ शकतो. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संमेलन आयोजनाचा मान वि.सा. संघाला मिळाला आहे. संमेलन स्थळाला राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी असे नाव देण्यात आले असून, मुख्य सभामंडपाला आचार्य विनोबा भावे यांचे नाव देण्यात आले आहे. वि. सा. संघाचे अध्यक्ष व संमेलन आयोजन समितीचे संयोजक प्रदीप दाते यांनी आयोजनाबाबतची माहिती बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. या प्रसंगी पूर्वाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी, कवी डॉ. कुमार विश्वास, आमदार डॉ. विश्वजित कदम, डॉ. डी. वाय. पाटील, अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघणार असून, त्यानंतर महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे या ध्वजारोहण करतील.

नागपूर ते वर्धा प्रवासासाठी बसचे तिकीट २०० रुपये…

नागपुरातून संमेलनासाठी वर्ध्याला जाणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी वि. सा. संघाने झाशी राणी चाैकातून वाहनाची व्यवस्था केली आहे. सकाळी ८ व ९ वाजता बसेस साेडण्यात येतील व रात्री ८ व ९ वाजता परत येता येईल. मात्र नागपूर ते वर्धा प्रवासासाठी २०० रुपये आकारले जात आहेत. वास्ताविक एसटीचे तिकीट १६० रुपये आणि ट्रॅव्हल्स कंपन्या या प्रवासासाठी १०० रुपये आकारतात. वि. सा. संघाने दुप्पट आकारले आहेत. त्यामुळे हा संघाद्वारे संमेलनाचा खर्च काढण्याचा तर प्रयत्न नाही, अशी चर्चा हाेत आहे.

शासनाने दिला निम्माच निधी…

संमेलनाच्या आयाेजनासाठी राज्य शासनाकडून निधी मिळाला नसल्याची चर्चा हाेती. मात्र सरकारने ५० टक्के म्हणजे २५ लाख रुपये निधी प्राप्त झाल्याचे प्रदीप दाते यांनी सांगितले. याशिवाय स्थानिक आमदारांकडूनही मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे; पण निवडणूक आचारसंहितेमुळे ते थांबले असल्याचे दाते यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 27-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here