रत्नागिरी : बागेतील आंबे काढण्याच्या कारणातून दोघांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ मे रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास वरवडे भंडारवाडी येथे घडली. सुशांत पंढरीनाथ बोरकर आणि प्रसाद पंढरीनाथ बोरकर (दोन्ही रा. वरवडे-भंडारवाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अंकुश रामचंद्र गुरव (६२, रा.वरचे वरवडे,रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सोमवारी गुरव यांचा मुलगा श्रीराम, मेव्हणा रविंद्र गुरव आणि ५ ते ६ कामगार असे त्या बागेतून आंबे काढून गाडीतून परतत होते. त्यावेळी सुशांत बोरकर आणि त्याचा भाऊ प्रसाद हे दोघे रिक्षा व दुचाकीवरुन तिथे आले. त्यांनी आपली वाहने गुरव यांच्या गाडीसमोर लावली. त्यानंतर संस्थेचा शिपाई विनायक नांदिवडेकर याला जमिनीच्या मालकीच्या वादावरुन शिवीगाळ करत सुशांत आणि प्रसादने लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी अंकुश गुरव यांनाही शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण केली. अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.
