मुंबई : पुढील वर्षात आम्ही ५ कोटी रोजगार निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमुळे ते प्रत्यक्षात उतरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘आत्मनिर्भर भारत पॅकेज म्हणजे एमएसएमईचं धोरण नव्हे. देशाच्या जीडीपीत एमएसएमईचं योगदान सध्या २९ टक्के आहे. ते ५० टक्क्यांवर नेण्याचं लक्ष्य आहे. सध्या ४८ टक्क्यांवर असलेली निर्यात ६० टक्क्यांवर नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे,’ असं गडकरी म्हणाले. दरम्यान, बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांनी एमएसएमई उद्योगांचे पैसे थकवले आहेत. हा आकडा ५ ते ६ लाख कोटींच्या घरात आहे. या कंपन्यांनी ४५ दिवसांमध्ये थकलेले पैसे द्यावेत, असे आदेश देण्यात आल्याची माहिती गडकरींनी सांगितली.
