रत्नागिरी: पुरस्थितीचा मोठा फटका एसटी सेवेला बसला

0

रत्नागिरी : पश्चिम महाराष्ट्रासह कोकणामध्ये गेले आठवडाभर पुरस्थिती असल्याचा मोठा फटका एसटी सेवेला बसला असून पुरेसे डिझेल नसल्याने आणि मिरज येथून डिझेल उपलब न झाल्याने जिल्ह्याबाहेरील बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यातही आवश्यक तेथे बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र गेले आठवडाभर पुराने वेढला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र गुरूवारपासून कोकणातील पावसाचा जोर ओसरल्याने येथील जनजीवन पुर्वपदावर येत आहे. परंतु डिझेल, पेट्रोलचे फिलिंग पॉईंट मिरज येथे असल्याने काही काळ येथे इंधनाचा तुटवडा भासत होता. परंतु पेट्रोल डिलर्सनी त्यांचा फिलिंग पॉइंट बदलल्याने विविध पेट्रोल पंपांवर गुरूवारपासूनच पेट्रोल, डिझेल उपलब्ध होऊ लागले आहे. परंतु एसटी महामंडळाला मोठी समस्या निर्माण झाली असून त्यांच्या डिझेलचे टँकर अद्यापही जिल्ह्यात पोहोचलेलेच नसल्याने बसफेऱ्यांना फटका बसला आहे. हि टंचाई गुरुवारी सकाळपासूनच एसटीला जाणवू लागली होती. त्यामुळे प्रथम एसटीच्या जिल्ह्याबाहेरील लांब पल्ल्याच्या गाड्या गुरूवार रात्रीपासून रद्द करण्यात आल्या. तर गुरुवारी सकाळीही डिझेल उपलब्ध न झाल्याने जिल्हातंर्गत फेऱ्यांमध्येही कपात करण्यात आली होती. जेथे आवश्यक आहे तेथेच बसफेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये राजापूर आगाराती लांब पल्लयांच्या गाडयांसह ग्रामीण भागात जाणाऱ्या सुमारे २५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. राजापूर आगारात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच डिझेल साठा असून डिझेलच्या तुटवटयामुळे मुंबई, कोल्हापूर, पुणे या लांब पल्ल्याच्या गाडयांसह ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली. चिपळूण तालुक्यात पूर पूर्णतः ओसरल्यानंतर चार दिवस ठप्प असलेली एस.टी. बसची सेवा गुरुवारी सायंकाळपासून सुरु करण्यात आली. परंतु पुरस्थितीमध्ये एस.टी. बस सेवा बंद असल्यामुळे आगाराचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. त्यातच या आगारातील डिझेलच्या टाकीत पाणी शिरले होते. तसेच पंपातही बिघाड निर्माण झाला होता. मात्र, गुरुवारी सकाळी डिझेल टाकीची साफसफाई करण्यात आली. व पंपाची दुरुस्ती करून बस सेवा सुरु करण्यात आली. या बस स्थानकातून दिवसाला ८१७ बसफेऱ्या सोडल्या जातात. मात्र, ५ व ६ ऑगस्ट रोजी एकही फेरी या आगारातून सोडण्यात आली नव्हती. दि. ७ रोजी सायंकाळी कमी प्रमाणात व दि.८ पासून वाहतून सुरु केली. मात्र त्यांनाही इंधन तुटवट्याचा फटका बसला. गुहागरमध्ये एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच आठवड्यापासून डेपोमधून एसटीच्या लांबपल्याच्या गाडया अजूनही सोडण्यात आलेल्या नाहीत. कोल्हापूर, पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या नियमित गाडयांबरोबर तालुक्यातील अनेक गावातील नेहमीच्या फेऱ्याही एसटीने बंद केल्या आहेत. त्यातच डिझेलची मोठी टंचाई एसटीला जाणवत आहे. देवरूख आगारातील डिझेल साठा कमी झाल्यामुळे गुरुवापासून गावांमधील नियमित फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत, गुरूवारी केवळ ३ हजार लि. डिझेल असल्याने लांजा येथून डिझेल मागविण्यात आले आहे. तसेच १ टैंकरही बुकींग केल्याची माहिती आगार प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. परिणामी शुक्रवारी निम्यापेक्षा जास्त फेऱ्या कमी झाल्याने देवरूख, संगमेश्वर बसस्थानकामध्ये शुकशुकाट दिसून आला. यामुळे काही ठीकाणी प्रवाशांची गैरसोय झाल्याचे चित्र पहायला मिळाले. जिल्ह्यात अन्यत्र तालुक्यातील बसवाहतूकही यामुळे प्रभावित झाली होती. शनिवारी सकाळपर्यंत डिझेलचे टँकर उपलब्ध होतील अशी माहिती एसटी सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यानंतरच ही सेवा पूर्ववत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here