कोरोना पार्श्वभूमीवर वाडीवस्तीवर कृतिदलाची होणार स्थापना

रत्नागिरी : मुंबई, पुणे सारख्या शहरातून बाहेरून येणाऱ्या वाढत्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडून केल्या जाणार्‍या सुचना वाडीवस्तीवर राबवण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज आहे. सध्या वाडीस्तरावर कृतीदल स्थापन करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिली. गेल्या आठ दिवसांमध्ये मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतू लागल्याने बाधित व्यक्तींची रत्नागिरी जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या येणार्‍या सुचनांचे काटेकोर पालन प्रत्येकाने करावे असे आवाहन जिल्हाधिकारी त्यांनी केले. जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या सुचनांची अंमलबजावणी तळागाळात करण्याची मोठी जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनावर आहे. गावात येणार्‍या परजिल्ह्यातील लोकांवर लक्ष ठेवणे, त्यांची माहिती प्रशासनाला कळवणे ही जबाबदारी आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका करत आहेत. चाकरमानी वाढत असल्यामुळे वाडीवर कृतीदल स्थापन करण्यात येत आहे. तशा सुचना ग्रामविकास विभागाकडून गटविकास अधिकार्‍यांना दिल्या गेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने दापोली, मंडणगड येथे प्रयोग सुरु केला आहे. चाकरमान्यांची नोंदी करणे किंवा अन्य कामांसाठी जिल्हा परिषदेने गेल्या दोन दिवसात आपला कर्मचारी वर्ग जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. सुमारे 32 कर्मचार्‍यांना तिथे सेवा बजावत आहेत. यापेक्षा अधिक कर्मचारी आवश्यक असले तर त्यांची नियुक्ती करण्याची तयारीही जिल्हा परिषदेने दर्शविली आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या मागे जिल्हा परिषद प्रशासन ठामपणे उभे आहे असं जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनी विश्वासाने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here