रत्नागिरी : मुंबई-पुण्याहून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे गोवा राज्याने खरेदी केलेले ‘ट्रुनॅट'( truenat) हे मशीन रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी खरेदी केली जाईल, असे ना. उदय सामंत यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘ट्रुनॅट’ हे मशीन आम्ही चाकरमान्यांची तपासणी करण्याकरिता वापरणार असून या मशीनमधून कोरोना निगेटिव्ह कळणार असून ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येणार नाहीत त्यांना पॉझिटिव्ह समजून त्यांचे स्वॉब तपासणीसाठी मिरज किंवा कोल्हापूरला पाठविण्यात येतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. पुढे सामंत म्हणाले, मी ट्रुनॅट मशीन बाबत गोव्याशी चर्चा केली. हे मशीन पॉझिटिव्ह रूग्ण सांगत नाही मात्र निगेटिव्ह रूग्ण सांगते. या मशीनद्वारे तासाला चार जणांची तपासणी करता येते, असे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत जरी असली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. पुढील काळातही रूग्ण वाढण्याची शक्यता आहे. मात्र कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन ना. उदय सामंत यांनी केले.
