मुंबई : अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. कोरोनामुळे झोपलेल्या अर्थव्यवस्थेस जाग आणण्यासाठी ही 20 लाख कोटींची खटपट आहे. या खटपटीस पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’ म्हटल्याने आधीच्या सर्व संकल्पना आणि योजना मागे पडल्या आहेत. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’वर आतापर्यंत कोटय़वधी रुपये नुसते जाहीरातबाजीवर खर्च केले तसे आत्मनिर्भरतेच्या बाबतीत घडू नये, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे. हे 20 लाख कोटींचे वाटप कसे होणार याची फोड अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. म्हणजे अर्थशास्त्रीय भाषेत रुपया कसा खर्च होणार त्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. 20 लाख कोटी ही साधी रक्कम नाही. या 20 लाख कोटींचा हिशोब अर्थमंत्र्यांनी मांडताच पहिल्या पाच मिनिटांत शेअर बाजार घसरला, तो अद्यापि सावरू शकलेला नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं आहे. अशा प्रकारचे मोठे आर्थिक पॅकेज जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात घसरून आपटलेला हिंदुस्थान हा पहिला देश असावा. याचा अर्थ असा की, 20 लाख कोटी प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात अवतरतील काय? याबाबत कॉर्पोरेट जगतात शंका असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
