चिपळूण : चिपळूण तालुक्यातील दसपटीतील कादवड गावचे ग्रामदैवत काळभैरव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रकमेची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना गुरुवारी (दि. २६ जानेवारी) रात्री घडली. चोरट्याने मंदिराचा पूर्वेकडील बाजूचा दरवाजा तोडून गाभाऱ्यात प्रवेश करत दानपेटीतील रोख रक्कम लंपास केली. दानपेटीमध्ये सुमारे एक लाख रुपये रक्कम असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. दानपेटी मंदिराच्या शेजारील असलेल्या नदीपात्रात आढळून आली.
या घटनेची माहिती कादवड गावातील ग्रामस्थ बळीराम शिंदे, सतीश शिंदे, जयराम शिंदे, स्वप्निल शिंदे, चंद्रकांत शिंदे, जयवंत शिंदे, उत्तम शिंदे, अनंत शिंदे आदी ग्रामस्थांनी अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे. शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज खोपडे व पी. एस. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:03 01-02-2023