आरवली : पाण्याच्या वादावरून महिलेला दमदाटी करून तिला व पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिल्यावर करजुवे येथील दोघा संशयितांविरुद्ध संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. यासंदर्भात प्रियंका अशोक नलावडे या महिलेने माखजन पोलिस दुरक्षेत्रावर तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये प्रियंका नलावडे यांनी करजुवे गावातील निवईवाडी येथील सार्वजनिक पाणवठ्यावर श्याम तुकाराम साळवी यांचे आंब्याच्या बागेत काम करणारे कामगार महिला पाणी भरण्यासाठी आल्या होत्या, त्या कामगारांना व अन्य इतर कामगारांना या ठिकाणी बोलावून घेऊ नका तसेच सार्वजनिक पाणवठ्यावर अस्वच्छता करू नका अशी समज दिली. यावरून श्याम साळवी यांची मुलं संशयित तुषार साळवी आणि कमलाकर साळवी यांना राग आल्याने त्यांनी राहत्या घरी येऊन मला आणि माझे पती अशोक नलावडे यांना बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारू, अशी धमकी देत शिवीगाळ केली. या दोघा संशयितांकडून आमच्या जीवितास धोका असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी केल्यावरून संगमेश्वर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत तुषार साळवी आणि कमलाकर साळवी यांच्यावर कारवाई केली.
