खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या दुसऱ्या पुलाचे काम जवळ जवळजवळ पूर्ण झाले असून मार्चअखेर हा पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे.
भरणे येथील उड्डाणपूल, जगबुडी नदीवरील पूल आणि दाभीळ येथील उड्डाणपुलाची कामे आता पूर्ण होत आली असल्याने येत्या काही महिन्यांत महामार्गावरील खेड तालुकाच्या हद्दीतील प्रवास सुसाट होणार आहे.
खेड तालुक्ल्याच्या हद्दीतील जगबुडी नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्च 2013 मध्ये महाकाली ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला भीषण अपघात झाला होता. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस मध्यरात्री नदीपात्रात कोसळली होती. या अपघातात 37 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर तत्कालीन शिवसेना खासदार अनंत गीते यांनी लोकसभेत जगबुडी नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती. जगबुडी नदीवर नवीन पूल बांधणे का गरजचे आहे हे अनंत गीते यांनी पटवून दिल्यानंतर तत्कालीन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जगबुडी नदीवरील पुलासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. निधी मंजूर होताच पुलाच्या कामाचा नारळ फोडण्यात आला, मात्र ठेकेदार कंपनीचं मध्येच काहीतरी बिनसल्याने ठेकेदार काम सोडून निघून गेला आणि पुलाचे काम रखडले. दरम्यान महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु झाले आणि कल्याण टोलवेज या ठेकेदार कंपनीने ठप्प झालेले पुलाचे काम पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली. कामाला सुरुवात केल्यानंतर कल्याण टोलवेज या कंपनीने पुलाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले आणि 2019 साली जगबुडी नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
आता त्याच नव्या पुलाच्या बाजूला आणखी एक पूल उभारला जात असून हा पूल महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उभारला जात आहे. या पुलासाठी 5 कोटी 80 लाख इतका निधी मंजूर असून हा पुलाचे कामदेखील कल्याण टोलवेज या कंपनीकडून सुरु आहे. गेल्या तीन वर्षात कल्याण टोलवेज या कंपनीने दुसऱ्या पुलाचे काम जवळ जवळ पूर्ण करत आणले असून मार्च 2023 अखेर जगबुडी नदीवरील दुसरा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत महामार्ग बांधकाम विभागाने दिले आहेत.
जगबुडीवरील दुसऱ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे, मात्र दुसरा पूल वाहतुकीस खुला झाल्यावर या दोन्ही पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे जगबुडी पुलावरील अपघाताचा धोका कायमचा संपुष्टात येणार आहे. नव्या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून आता दोन्ही बाजूच्या अप्रोच रोडचे काम सुरू करण्यात आले आहे. अप्रोच रोडचे काम पूर्ण झाले की, या पुलावरून वाहतूक सुरू केली जाईल, असे बांधकाम विभागाचे अभियंता माडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
भरणे नाका येथील उड्डाणपुलाचे कामदेखील आता अंतिम टप्प्यात असून मार्चअखेर हे काम पूर्ण होणार आहे. त्याशिवाय दाभीळ येथील उड्डाण पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असून ते मार्च- एप्रिलदरमयान पूर्ण होईल. या उड्डाणपुलावरूनदेखील वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे भरणे, जगबुडी आणि दाभीळ या तीन ठिकाणच्या पुलांची कामे पूर्ण होऊन हे तीन पूल वाहतुकीस खुले झाले की खेड तालुक्याच्या हाद्दीतील महामार्गावरील प्रवासाची वाहतूक सुरक्षित होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:03 01-02-2023
