मुंबई : राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आज एका दिवसात तब्बल 60 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1061 वर पोहोचली आहे. यात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. गेल्या दोन दिवसात 136 पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे. आज (15 मे) एका दिवसात 60 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काल एका दिवसात 76 पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1,061 वर पोहोचला आहे. यात 112 अधिकारी आणि 949 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाची लक्षण असणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत 90 अधिकारी आणि 788 पोलीस कर्मचारी अशा एकूण 878 पोलिसांत लक्षण दिसून येत आहेत. तर 22 अधिकारी आणि 152 पोलीस कर्मचारी असे एकूण 174 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्देवाने 9 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
