राजापूर : रायपाटण ग्रामीण रुग्णालयाच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याची दोन दिवसांपूर्वीच तातडीने दापोली येथे बदली करण्यात आली आहे. तर दुसरे कार्यरत वैद्यकीय अधिकारी सर्दी, ताप व उच्च रक्तदाबाने आजारी पडल्याने ते वैद्यकीय रजेवर निघाले आहेत. यामुळे डेंग्यू व विलगीकरण केलेल्या रुग्णांचे काय होणार? याची चिंता निर्माण होऊन हे रुग्णालयाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याचा कोरोनाचा फैलाव तसेच पाचल मध्ये डेंग्यूची साथ सुरु असताना डॉक्टरांच्या बदलीचे कारण काय असा सवाल रायपाटणचे सरपंच राजेश नलावडे यांनी उपस्थित केला आहे. कार्यरत डॉक्टर सुद्धा अचानक आजारी पडल्याने रुग्णालयाचे काय होणार असा सवाल केला जात आहे. सध्या कोरोना असल्याने स्वाब नमुने घेणे व इतर प्रशासकीय कामे करावी लागत आहेत. त्यामुळे कामाचा प्रचंड ताण पडत आहे. कार्यरत डॉक्टर मधुमेहाने ग्रस्त असल्याने एकट्याच डॉक्टरला २४ तास सेवा द्यावी लागल्याने तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे पत्र रुग्णालयाकडून जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोल्डे यांना देण्यात आले आहे. या पत्रामध्ये रायपाटण येथे तात्काळ एक वैद्यकीय अधिकारी मिळण्यासाठीही शिफारस करण्यात आली आहे. परंतु याची कार्यवाही कधी होणार? याकडे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीला गंभीर साथीच्या आजारांमध्ये तातडीने एक वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयास पाठविण्यात यावा. अन्यथा ग्रामस्थ आक्रमक झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा रायपाटणचे सरपंच राजेश नलावडे यांनी दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:02 PM 15-May-20
