कोकणातल्या गावी चालत निघालेल्या व्यक्तीचा पेणजवळ दुर्दैवी मृत्यू

पेण : मुंबईवरून श्रीवर्धनला चालत निघालेल्या व्यक्तीचा मुंबई-गोवा महामार्गावर तरणखोप नजीक दुर्दैवी अंत झाला. कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोकणात गाव असलेल्या मात्र मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या अनेकांनी शक्य होईल त्या मार्गाने गावाला परत जायला सुरुवात केली आहे. यातले बहुसंख्यजण हे पायी गावाला निघाले आहेत. कांदिवली पूर्वेचे रहिवासी असलेले मोतीराम जाधव (45 वर्षे) हे देखील आपल्या कुटुंबासह गावी निघाले होते. ते मूळचे श्रीवर्धनचे रहिवासी असल्याचे कळते आहे. तरणखोप गावाच्या हद्दीतील हॉटेल पार्क इन सहारा समोर रात्री 10 च्या सुमारास जाधव कुटुंब पोहोचलं होतं. तिथे पोहोचल्यानंतर मोतीराम जाधव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते रस्त्याच्या कडेला थांबले. घाबरलेल्या ममता जाधव यांनी मदत मागितली आणि त्यानंतर मोतीराम जाधव यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here