दाभोळ : दापोली तालुक्यात नव्याने चारजण कोरोनाबाधित आढळल्याने तालुक्यातील रुग्णांची संख्या १२ वर जाऊन पोचली आहे. या चौघांपैकी तिघेजण होम क्वारंटाईन होते, तर एकजण दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. कोरोनाबाधित असलेल्यांमध्ये बोरिवली गावातील २, साकुर्डेमधील १ व सडवे गावातील १ असे चार रुग्ण आहेत. हे सर्वजण मुंबई येथून आले आहेत. जे तीन संशयित होम क्वारंटाईन होते, त्यांना आता दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दोन दिवसांपूर्वी या तिघांना एसटीने गावात सोडले होते. गावी गेल्यावर आता या तिघांच्या संपर्कात कितीजण आले आहेत, याची यादी आरोग्य विभागाकडून केली जात आहे.
