सत्यजीत तांबे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार का? नाना पटोले स्पष्टच बोलले..

0

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला म्हणून काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. काँग्रेसच्या हायकमांडकडून तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण आता या निवडणुकीत त्यांना विजय मिळाल्यानंतर सत्यजीत तांबे आणि त्यांचे पिता सुधीर तांबे यांच्यावरील निलंबन मागे घेणार का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.

HTML tutorial

यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. मी कालही सांगितलं, याविषयाचा निर्णय हायकमांडच घेईल. त्यांचं निलंबन हे हायकमांडच्या स्तरावर झालेलं आहे. त्यामुळे हायकमांडच्या निर्णयावर बोलणं बरोबर ठरणार नाही”, अशी स्पष्ट प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. “काल आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद ऐकत होतो. त्यांनी सत्यजीत तांबे यांच्या विजयावर आनंद व्यक्त केला”, असं ते म्हणाले.

“ज्यावेळेस मतदान झालं, त्यावेळी तातडीने त्यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर त्यांचे नेते असतील त्यांनी जाहीरपणे सांगितलं की, आम्ही सत्यजीत तांबे यांना निवडून देणार आहोत. डॉ. सुधीर तांबे काही बोलले नाहीत. पण भाजपचेच लोकं बोलले की ते निवडून येतील”, असं नाना पटोले यांनी सांगितलं. “ज्या पद्धतीने चाललं होतं, देवेंद्र फडणवीस सत्यजीत तांबे यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करत होते. दुसऱ्याच्या घरात आग लावणं सोपं आहे. आता विदर्भात त्यांच्या घरात आग लागली. त्याचं काय? त्याचं उत्तर ते देणार आहेत का?”, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

“सत्यजीत तांबे यांनी गौप्यस्फोट करावा. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडली होती. आम्ही डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिलं होतं. त्यांचं तिकीट जाहीर झालेलं होतं. त्यांनी काँग्रेसकडे कोणताही अर्ज केलेला नव्हता. याशिवाय तशी मागणीदेखील केलेली नव्हती”, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

“बाळासाहेब थोरात स्वत: त्या कमिटीमध्ये आहेत. त्यांनीदेखील तशी मागणी केलेली नव्हती. आता सत्यजीत तांबे काय भूमिका मांडतात ते आपण बघू. आम्हाला आता तरी त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाहीय. ते निवडून आले त्याबद्दल आमच्या शुभेच्छा आहेत”, अशी भूमिका पटोले यांनी मांडली.

“बाळासाहेब थोरात हे नागपूरच्या अधिवेशनावेळी पडले. त्यामुळे त्यांचा हात फॅक्चर झाला. ते काही दिवस रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते बाहेर आले नाही. बाळासाहेब जेव्हा बाहेर येतील तेव्हा सांगतील”, असं नाना यांनी सांगितलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:27 03-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here