उल्हासनगर : कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या मृतदेहाला अंघोळ घालून त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्यांपैकी 10 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याप्ररकणी महापालिका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या नातेकाईकांवर गुन्हा दाखल करणार आहे. उल्हासनगर शहरात एका कोरोना संशयित 50 वर्षीय व्यक्तीचा 9 मे रोजी मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना द्यायला मध्यवर्ती रुग्णालयाने नकार दिला. मात्र, त्यावेळी आम्ही कोरोनाचे नियम पाळून अंत्यविधी करु, असं लेखी आश्वासन कुटुंबियांनी दिले. त्यानंतर रुग्णालयाने मृतदेह कुटुंबाला सुपूर्द केला. मात्र, लेखी आश्वासन देऊनही या कुटुंबाने नियमांचे उल्लंघन करत त्या व्यक्तीवर अत्यंसंस्कार केले. कुटुंबियांनी मृतदेह उघडून त्याला अंघोळ घातली, यावेळी अनेकांचे त्याला हात लागले. त्यानंतर 20 जणांची परवानगी असतानाही तब्बल 60 ते 70 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला. त्यानंतर 11 मे रोजी त्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या व्यक्तीवर नियमांचे उल्लंघन करत अत्यंसंस्कार करण्यात आल्याचं कळताच उल्हासनगर महापालिकेने अंत्यविधीला उपस्थित सर्वांना क्वारंटाईन केलं. त्यापैकी 10 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 9 जण हे त्या व्यक्तीच्याच कुटुंबातील आहे तर एक जण परिसरात राहणारा आहे. याप्रकरणी नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे.
