रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याचे दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. त्याकरिता नोंदणी करण्याचे आवाहन हापूस उत्पादकांना करण्यात आले आहे.
चालू वर्षाच्या आंबा हंगामाकरिता उत्पादकांना आंबा विक्रीकरिता पुणे आणि राज्यातील, परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्याकरिता आंबा उत्पादकांची नोंदणी ६ फेब्रुवारीपासुन सुरू करण्यात येणार आहे. कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी ही माहिती दिली. नावनोंदणी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे. स्टॉल नोंदणीकरिता आंबा नोंदीसह मागील ६ महिने कालावधीतील सातबारा उतारा, आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत, करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, भौगोलिक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नावे दहा हजार रुपये अनामत रकमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहित नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इत्यादी कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत.
इच्छुक आंबा बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागिय कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी आवार शांतीनगर, नाचणे, जि. रत्नागिरी (दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२९९३२८) अथवा कृषि व्यवसाय पणन तज्ज्ञ कपिल खामकर (८८०५६५२२३३) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:09 03-02-2023
