रत्नागिरी : उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रचंड वेगाने सोसाट्याचे वारे वाहू लागल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मच्छीमारांना मासेमारी करणं कठीण झाल्याने मच्छीमारी नौकांनी मिळेल त्या बंदराचा तसेच खाड्यांचा आधार घेतला आहे. पुन्हा एकदा वातावरणातील बदलामुळे मासळी उद्योग अडचणीत आल्यामुळे मच्छीमार चिंतेत पडला आहे.
यावर्षी येथील मच्छीमारांना बऱ्यापैकी मासळी मिळू लागली होती. मासळी मुबलक असली तरी पाहिजे तसा मासळीला दर मिळत नव्हता. त्यात गेले दोन दिवसांपासून या उत्तरेकडील वाऱ्याने मच्छीमारांच्या तोंडचे पाणी पळवले. त्यामुळे संपूर्ण किनारपट्टीला थंड वारे सुरु झाले आहेत. थंडीचे प्रमाण देखील वाढले आहे.अचानक आलेल्या या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या नौकांची तारांबळच उडाली. मिळेल त्या बंदरात व खाडीत सुरक्षिततेसाठी पलायन केले.
किमान १०० नौकानी रत्नागिरी बंदरात, साधारण २०० नौकांनी हर्णे बंदरात तर जयगड खाडीत १०० ते १५० नौका तर किमान १०० नौकांनी आंजर्ले खाडीत आणि साधारण ५० नौकांनी दिघी खाडीचा आसरा घेतला आहे. अजूनही पुढील दोन दिवस असच शांत रहावं लागणार आहे. जोपर्यंत वादळी वाऱ्याच वातावरण शांत होत नाही तोपर्यंत आम्ही मासेमारी करिता जाऊ शकत नाही. कारण आत खोल समुद्रात लाटांचे तडाखे मारत आहेत. नौका बुडण्याची शक्यता असते असे येथील मच्छीमारांनी सांगितले. विक एंडला मासेमारी ठप्प राहणार असल्याने खवय्यांची पंचाईत होण्याची असून पुढील दोन दिवस मासळीचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. आणखी चार दिवस मासळी मिळणार नाही त्यामुळे अनेक बाजारातील मासळी विक्री करणाऱ्या महिलांना देखील फटका बसला आहे. या वेगवान वाऱ्यामुळे सकाळी जाऊन संध्याकाळी मासळी घेऊन येणाऱ्या छोट्या होड्या देखील ठप्प झाल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 04-02-2023
